पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उसतोड मजूर कुटुंबातील दीपकवर काळाचा घाला

बीडमध्ये पोलीस भरती सुरू असतानाच अचानक कोसळून मृत्यू; कुटुंबावर शोककळा
Police Aspirant Deepak Death
Police Aspirant Deepak Death
Published on
Updated on

परळी वैजनाथ: पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात भरतीसाठी उतरलेल्या दीपक व्हावळे यांच्यावर काळाने घाला घातला. बीडच्या परळी तालुक्यातील मांडेखेल येथे ही घटना घडली. या घटनेने मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे. ऊसतोड मजूर कुटुंबातील या युवकाचे ऐन पोलीस भरतीदरम्यान मैदानावरच भरती प्रक्रियेत असताना अकाली मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान बुधवारी (दि.11) दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर व्हावळे (रा. मांडेखेल.ता. परळी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता. भरतीदरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच अचानक मैदानावर कोसळून त्याचा मृत्यू झाला.

दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news