पुरातन कालीन 'तलवाडा वेस' जीर्णावस्थेत  Pudhari photo
बीड

Beed News | पुरातनकालीन 'तलवाडा वेस' जीर्णावस्थेत ; मागणी करूनही दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

दुरुस्तीअभावी जीर्णावस्थेत असून कधीही ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : तालुक्यातील तलवाडा गावच्या पूर्वेकडील मुख्य रस्त्यावर, पोलीस स्टेशनलगत दगडीचिऱ्यांत बांधलेली ऐतिहासिक वेस सध्या मोडकळीस आली आहे. गावच्या सांस्कृतिक वैभवाचा एक भाग मानली जाणारी ही वेस दुरुस्तीअभावी जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुळात या वेशीचे बांधकाम शतकांपूर्वी झाले असून गावाच्या प्रवेशद्वारावर ती एक वैभवशाली ओळख होती. परंतु कालांतराने पावसामुळे दगडाखालची माती वाहून गेली आहे. काही दगड निसटले, तर काही खाली पडले आहेत. यामुळे वेशीची स्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. गावकरी सांगतात की, या वेशीची दुरुस्ती करण्याची मागणी वेळोवेळी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती. विशेषतः दलित वस्ती सुधारणा निधीतून काम करावे, अशी मागणी अनेकदा झाली. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले.

या वेशीचे गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यातही महत्त्व आहे. दरवर्षी पोळा सणानिमित्त गावात बैलांची मिरवणूक याच वेशीतून नेली जाते. सध्या वेस मोडकळीस आली असल्याने कधीही पडून मोठे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. इतिहास सांगतो की, महाराष्ट्रातील अनेक गावे ही प्राचीन वास्तू, शिल्पकला आणि किल्ल्यांसाठी ओळखली जात. काही ठिकाणी आजही शिवकालीन वास्तू ठाम उभ्या आहेत, तर अनेक वास्तूंचे नामशेष होणे सुरू झाले आहे. त्याचाच प्रत्यय तलवाड्यातील या वेशीतून येतो.

गावातील नागरिकांचा ठाम विश्वास आहे की, जर वेळेतच दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले तर वेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहील आणि गावाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवात भर घालेल. अन्यथा ही पुरातन वेस इतिहासजमा होईल, अशी भीती गावकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT