धामणगाव शिवारात रविवारी रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या अंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. Pudhari News Network
बीड

बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या अंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : तालुक्यातील धामणगाव शिवारात रविवारी (दि.8) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या अंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. या टोळीतील आठ जणांपैकी चौघांना पोलिसांनी दुचाकीसह मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. तर इतर चौघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या दरोडेखोरांकडून विना क्रमांकाच्या चार दुचाकी, किंमती मोबाईल, लोखंडी गज, कत्ती, धारदार शस्त्र असा एकूण चार लाख सत्तर हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवारात रविवारी (दि.८) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास संशयित आठजणांची टोळी एका हॉटेल परिसरात असल्याची गोपनीय माहिती सपोनी मंगेश साळवे यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे अंभोरा पोलिसांनी तात्काळ विनाविलंब घटनास्थळी धाव घेतली असता, त्या ठिकाणी विशाल अनिल कंधारे (वय २४ रा. वारजे दांगट ईस्ट राजनंदनी कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर-१०७ ता. हवेली जि. पुणे) अमर बाबासाहेब हजारे (वय ३० रा. वाघाळा ता. अंबाजोगाई जि. बीड, हल्ली मुक्काम साई समृद्धी आपारमेंट शिवणे देशमुखवाडी ता. हवेली जि. पुणे) अमित अण्णागोंडा पाटील (वय - ३० रा. रामनगर शिवाजी चौक वारजे, माळवाडी ता. हवेली जि. पुणे), तुषार आनंद भरोसे (रा. वारजे माळेवाडी पुणे) या चौघांना दरोड्याच्या तयारीत असताना अंभोरा पोलिसांनी एका हॉटेल जवळून जागीच ताब्यात घेतले.

मात्र, या टोळीच्या इतर चौघा साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला. या दरोडेखोरांकडून विना क्रमांकाच्या चार दुचाकी, लोखंडी गज, कत्ती, एक धारदार शस्त्र, दोन लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा जवळपास चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला. याबाबत अंभोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चौघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सपोनि मंगेश साळवे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतीश पैठणे, सुदाम पोकळेंसह वाहनचालक पडवळ यांनी सहभाग घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT