Ambajogai Bus Stand Gold Chain Theft Case
अंबाजोगाई : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून सोन्याचे गलसर चोरणाऱ्या महिलेला अंबाजोगाई शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले ८.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर, अंदाजे ५६ हजार रुपये किमतीचे, हस्तगत केले आहेत. गुन्हा घडल्यापासून महिन्याच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
दि. १५ जुलै रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकात ही घटना घडली. फिर्यादी जरीन ईस्माईल मुजावर (वय २४, रा. गाडिपुरा, धाराशिव) या पतीसोबत धाराशिव येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपी महिलेने जरीन मुजावर यांच्या पर्समधून काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले सोन्याचे गलसर चोरून नेले.
याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत लातूर येथील महेक शेख हिचा आरोपी म्हणून शोध घेतला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडून चोरीचे संपूर्ण सोन्याचे गलसर हस्तगत करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक तेजस व्हावळे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलिस हवालदार पांडुरंग काळे, पोलिस नाईक तेजस व्हावळे आणि पोलिस अंमलदार हनुमंत चादर यांनी केली.