

Ambajogai Municipal Council Abhijit Lomte Hunger Strike
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अभिजित लोमटे यांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल माजी केंद्रीय मंत्री तथा पर्यावरणप्रेमी मेनका गांधी यांनी घेतली असून, शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
अंबाजोगाई शहरातील जयवंती नदीपात्रातील कथित बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमण, महाराष्ट्र बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवून करण्यात आलेले गाळे, सर्व्हे क्रमांक १७ येथील डम्पिंग ग्राउंडवर श्वानांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूंची चौकशी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व मराठा भवनाची उभारणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण या विविध मागण्यांसाठी लोमटे यांनी उपोषण सुरू केले आहे.
नगर परिषद प्रशासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोमटे यांनी केला आहे. शहरातील सार्वजनिक मालमत्ता, पर्यावरण आणि नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी त्यांची मागणी आहे.
लोमटे यांच्या उपोषणाला अंबाजोगाई शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. यामध्ये शिवसेनेचे मदनलाल परदेशी, लोकजनशक्ती पार्टीचे तेजस व्हावळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महेंद्र निकाळजे, अमर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, धीमंत राष्ट्रपाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आमरण उपोषणाचा सहावा दिवस सुरू असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून या मागण्यांवर नेमकी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रश्नांवर सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.