अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावला Pudhari
बीड

Ambajogai Burglary | अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा; दोघे अटकेत, २७ तोळे सोने जप्त

अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसांत छडा

पुढारी वृत्तसेवा

Ambajogai Theft Case

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावला असून, दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २७ तोळे (२७० ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि ८५८ ग्रॅम चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून, त्याचा शोध अंबाजोगाई शहर पोलिसांकडून सुरू आहे.

अंबाजोगाई शहरातील एका घराला कुलूप लावून कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे ५३ तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची माहिती मिळताच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेतली तसेच परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये तीन संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आले.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे अमर काकासाहेब थोरात (२३, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) हा चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परळी परिसरात सापळा रचून अमर थोरात याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (३२, रा. शिवाजी चौक, परळी) याचे नाव सांगितले. पोलिसांनी दुधानी यालाही ताब्यात घेतले.

चौकशीत मंगलसिंग हिरासिंग बावरी याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्याची युनिकॉर्न दुचाकी वापरल्याचेही तपासात निष्पन्न झाले. अमर थोरात आणि जगजीतसिंग दुधानी यांच्याकडून चोरीतील २७ तोळे सोने आणि ८५८ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. मंगलसिंग बावरी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT