Accident News Pudhari
बीड

Beed accident: केज तालुक्यात ऊस तोडणीसाठी बळजबरीने पळवून नेलेल्या मजुराचा अपघातात मृत्यू

संबंधित मजुराला ऊस तोडणीसाठी जाण्याची इच्छा नव्हती, तरीही त्याला जबरदस्ती करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

केज: ऊस तोडणीसाठी बळजबरीने पळवून आणलेल्या एका मजुराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मयताच्या भावाने या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.

नवनाथ नामदेव वायबसे याला सिद्धेश्वर उर्फ तात्या महादेव चौरे याच्यासोबत ऊस तोडणीसाठी जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने घेतलेली ८ हजार रुपयांची उचल परत देखील केली होती. मात्र, १९ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास गव्हाणथडी (ता. माजलगाव) येथून सिद्धेश्वर उर्फ तात्या महादेव चौरे आणि सारंग उर्फ बाळू हनुमंत चौरे या दोघांनी नवनाथला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले.

अपघाताचा घटनाक्रम

रस्त्यात नवनाथला दारू पाजण्यात आली. त्यानंतर ते तिघे मोटारसायकलवरून धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे जात असताना, केज-कळंब महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील हॉटेल ९२९२ जवळ थांबले. यादरम्यान नवनाथ हॉटेलमधून उठून रस्ता ओलांडून जात असताना, रस्ता दबईचे लहान रोलर घेऊन जाणारे पिवळ्या रंगाचे ॲपे मालवाहू पिक-अप वाहन (क्र. MH 25/P 4564) ने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत नवनाथच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यावर पडला. तो जखमी अवस्थेत पडलेला असतानाच, समोरील बाजूने येत असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या टमटमनेही त्याला धडक दिली.

आरोपींचा पळ आणि उपचारापूर्वीच मृत्यू

अपघातानंतर नवनाथला बळजबरीने पळवून नेणारे सिद्धेश्वर उर्फ तात्या महादेव चौरे आणि सारंग उर्फ बाळू हनुमंत चौरे हे दोघेही त्याला घटनास्थळीच सोडून पसार झाले. त्यांनी नवनाथच्या कुटुंबातील कोणालाही या अपघाताची माहिती दिली नाही. घटनेनंतर नवनाथ वायबसे याला उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे दाखल करण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.

पोलिसांची कारवाई

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशानुसार दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात आणून जमा करण्यात आली आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT