Beed: 20% hike in rates for shaves and haircuts
बीड, पुढारी वृत्तसेवाः सलूनमध्ये लागणारे शॅम्पू, हेअर कलर, फेशियल साहित्य, ब्लेड, टिश्यूपेपर, सौंदर्यप्रसाधन, कॉस्मेटिक आणि इतर साहित्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे बीड जिल्ह्यातील सलून व्यावसायिक बांधवांनी ग्रामीण व शहरी भागातील सलून सेवांच्या दरांमध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता नागरिकांना कटिंग, दाढी व इतर सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
बीड येथे मार्गदर्शक धर्मराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष किशोर गाडेकर, मुकुंद काळे, विठ्ठल घोडके, दिलीप वखरे, नागेश टाकळकर, गौतम बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नाभिक आरक्षण कृती समिती व बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला समाजातील व्यावसायिक व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत वाढती महागाई, दुकानभाडे, वीजबिल, कर्मचारी वेतन तसेच दर्जेदार सौंदर्यप्रसाधनांच्या वाढलेल्या किमतींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
व्यवसाय टिकवण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. हा निर्णय बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील दोडके, उपाध्यक्ष अशोक दोडके व राजेंद्र शिंदे, सचिव बापू झांबरे आणि संघटक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला. संघटनेच्या या निर्णयाचे शहरातील नाभिक बांधवांनी स्वागत केले असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ग्राहकांच्या खिशाला झळ, व्यावसायिकांची मजबुरी
या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार असली, तरी गुणवत्ता आणि सुविधा चांगल्या राहिल्या तर ग्राहक निश्चितच या दरवाढीला सहकार्य करतील, असा विश्वास सलून व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. महागाईच्या या कत्रीत एकीकडे सामान्य जनता होरपळत असताना, दुसरीकडे आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी नाभिक समाजाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे चित्र दिसत आहे.