Suresh Dhas controversy
कडा: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचे नाव हेतुपुरस्सर पुढे केले जात असल्याचा तीव्र निषेध संदिप खाकाळ यांनी व्यक्त केला आहे.
खाकाळ म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी काही जण आधारहीन, खोटे आणि पातळी सोडून आरोप करून आमदार सुरेश धस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
हल्ल्याच्या घटनेशी आमदार धस यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही सोशल मीडियावर त्यांना मुद्दाम जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असून तो अत्यंत संतापजनक असल्याचे खाकाळ यांनी स्पष्ट केले.
राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर आहे. त्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, याला आमची कोणतीही हरकत नाही. परंतु त्या प्रकरणाचा धस यांचा काहीच संबंध नसतानाही त्यांना टार्गेट करण्याची प्रवृत्ती केविलवाणी आहे,असे ते म्हणाले.
सोशल मीडियावर काही जण राजकीय फायद्यासाठी आमदार धस यांच्यावर सतत मनमानी आरोप करत असल्याचा आरोप खाकाळ यांनी केला. ठोस पुरावे नसताना माध्यमांसमोर येऊन बदनामी करण्याचे प्रकार गंभीर असून अशांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.