Beed News : वादानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे आडमुठे धोरण file photo
बीड

Beed News : वादानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे आडमुठे धोरण

आष्टी शाखेतील व्यवहार कुंभार पिंपळगाव शाखेकडे वर्ग- शाखा बंद असल्याने शेतकऱ्यांसह खातेदारांचे हाल.

पुढारी वृत्तसेवा

Bank of Maharashtra's obstinate stance following the dispute

आष्टी, पुढारी वृत्तसेवाः बँक ऑफ महाराष्ट्रच्या आष्टी शाखेमध्ये चार दिवसापूर्वी झालेल्या वादामुळे येथील सर्व व्यवहार कुभार पिंपळगाव शाखेत वर्ग करण्यात येत असल्याचा फलक दर्शनी भागात लावल्यामुळे आष्टी येथील शेतकरी, सर्वसाधारण खातेदार आणि व्यापारी यांची भंबेरी उडाली आहे. यामुळे बँकेच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, बुधवार दि. २८ जुलै रोजी आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत शेतकरी आणि शाखाधिकारी यांच्यात मयत खातेदाराच्या कर्जमाफी तपासणी वरुन वाद झाला होता. वादानंतर शाखाधिकारी आणि शेतकऱ्यांत परस्पर तक्रारीवरुन आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बँकेचे कार्यालय बंद अवस्थेत आहे. शिवाय, या शाखेतील बँकिंग व्यावहार पुढील सुचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कु.पिंपळगाव शाखे मार्फत करण्यात येतील, असे फलक लावण्यात आले आहे. यामुळे खातेदारांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

ग्राहक सेवा मार्फत १० ते २० हजारापर्यंत आधार सलग्न असलेल्या खात्याचे व्यवहार होतात. मात्र चेक, मोठी रक्कम, डी. डी. ई केवायसी सह ज्यांचे अंगठे लागत नाहीत अशांना बँकेतच जावे लागते. आष्टी कुभांरी पिंपळगाव जवळपास २० कि. मी. चे अंतर असुन येवढ्या लांबून व्यावहार करणे जिकरीचे बनले आहे. आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा त्वरित सुरू करावी अशी मागणी होत आहे नसता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत क्षेत्रीय अधिकारी श्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शेतकरी आक्रमक ; रस्त्यावर उतरणार!

सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या आष्टी गावात गेल्या ३० वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा कार्यरत आहे. शाखा व्यवस्थापक हितेश चतुरभाई दामोर यांच्याविरोधात शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, दलालांमार्फत व्यवहार होत असल्याचे तसेच काही नागरिकांशी गैरवर्तन केल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. ४० किलोमीटरचा प्रवास करून बँकेची कामे करावी लागतील. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तालुका व जिल्हास्तरावर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकरी व खातेदार नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT