Ambajogai child treatment death
अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील एका रुग्णालयात ४ दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते. कारण ८ जुलैरोजी जन्मलेले बाळ अवघ्या काही तासांतच डॉक्टरांनी मृत घोषित करून ते कपड्यात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. बाळाच्या अंत्यविधीची होळ या गावी तयारी करण्यात आली. खड्डा खणत असताना आजीची बाळाचे तोंड पाहण्याची इच्छा झाल्याने कपड्यात बांधलेले ते बाळ खोलून पाहिले असता त्याचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तत्काळ बाळाच्या आजोबांनी बाळास परत अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्या बाळास अतिदक्षता विभागात दाखल केले. दरम्यान, उपचारादरम्यान आज (दि.१२) त्या दुर्दैवी बाळाने अखेर जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या बाळाच्या मृत्यूस जबाबदार कोण ? हा मोठा व निरुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे.
होळ येथील बालिका घुगे या महिलेच्या बाळाचा जन्म अवघ्या सातव्या महिन्यांत झाला होता. अशक्त असलेल्या बाळाला अतिदक्षता विभागात दाखल केले होते. परंतु, उपचारांना प्रतिसाद न देल्याने अखेर शुक्रवारी (दि. ११) रात्री बाळाने अखेरचा श्वास घेतला. या बाळाच्या जन्माने व निधनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती शास्त्र विभाग व बाल रोग विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. जिवंत असलेल्या बाळास मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांचा तपास लागण्यापूर्वीच या बाळाने अखेरचा श्वास घेतला आहे. बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या बाल रोग विभागाच्या अंतररुग्ण कक्ष विभागात घडलेल्या या लांच्छनास्पद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. जिवंत असलेल्या बालकास मृत घोषित करणा-या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी तातडीने पाच सदस्यीय समिती नियुक्त करून स्त्री रोग विभागाचे प्रमुख यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा मागितलेला लेखी अहवाल अजून तरी सादर केलेला नाही. आता हा अहवाल समोर आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.