Kej Minor Girl Abduction Attempt
गौतम बचुटे
केज : वडिलांना शेतात जेवण देऊन घराकडे परत येत असलेल्या एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञाताने तोंड दाबून तिचे अपहरण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या मुलीने केज शहर जवळ येताच आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्याने तिला रस्त्यात सोडून पळ काढल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे बुधवारी ( दि. ५) सकाळी १० च्या सुमारास मुलगी वडिलांना शेतात जेवण देऊन घराकडे परत येत होती. तिला रस्त्यात अनोळखी व्यक्तीने अडवून वडिलांची चौकशी केली आणि त्यांना भेटायचे आहे. त्यांच्याकडे माझे पैसे आहेत, असे सांगितले. मुलीने त्या व्यक्तीला वडिलांकडे घेऊन जाते; असे म्हणताच त्यांनी तिचे तोंड दाबून गाडीवर बसवून अपहरण केले. तिला तो केजकडे घेऊन येत असताना केज शहाराजवळ असलेल्या कानडी रोड लगतच्या वीटभट्टी जवळ आल्या नंतर तिने आरडाओरड केल्यानंतर अपहरणकर्त्याने मुलीला रस्त्यात सोडून मोटार सायकलीवरून पळ काढला.
त्यानंतर मुलगी केज बस स्टँडवर चालत आली. त्या ठिकाणी तिला तिच्या वडिलांची आत्या कासाबाई हिने पहिल्यानंतर तिने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वडील शहादेव चौरे यांनी केज येथे येऊन मुलीला ताब्यात घेत केज पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
यावरून केज पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे तपास करीत आहेत.