कडा : दुष्काळ केवळ माणसांच्या डोळ्यांतील पाणी आटवत नाही; तो जंगलातील मुक्या जीवांच्या जगण्याची उमेदही हिरावून घेतो. आष्टी तालुक्यातील कडा-शिरापूरच्या डोंगर परिसरात दिसणारे शराटी पक्ष्यांचे दृश्य दुष्काळाची दाहकता किती भयावह आहे; याची जाणीव करून देणारे आहे.
नदी-नाले, तलाव आणि पाणथळ जागांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या शराटी पक्ष्याचे नैसर्गिक आधारच यंदाच्या दुष्काळाने हिरावून घेतले आहेत. डोंगरातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे तहान भागवण्यासाठी या पक्ष्यांना माळरानावर भटकंती करावी लागत असून निसर्गाच्या कुशीत सुरू असलेला हा संघर्ष काळीज हेलावून टाकणारा आहे.
या दृश्यातील सर्वाधिक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे या पक्ष्यांची लहान पिल्ले आहेत. पंखांमध्ये बळ आलेले नसताना ही पिल्ले आपल्या पालकांवर अवलंबून आहेत. त्यांना सोडून दूरवर पाण्याच्या शोधात जाणे पालक पक्ष्यांना शक्य होत नाही. पिल्लांची भूक, तहान आणि संरक्षण या जबाबदाऱ्यांनी त्यांना त्याच परिसरात बांधून ठेवले आहे. माणसाला तहान लागली तर तो पर्याय शोधतो; जनावरांसाठी व्यवस्था करू शकतो. मात्र; या मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांनी तहानेने व्याकूळ झाल्यावर कोणाकडे जायचे, असा संवेदनशील प्रश्न निर्माण झाला आहे.
तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्याचे आवाहन
कडा-शिरापूर परिसरात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्याचा संकल्प निसर्गप्रेमी नितीन अळकुटे यांनी केला आहे. या उपक्रमात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या शेतात, घराच्या परिसरात किंवा झाडाखाली स्वच्छ पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि त्यात दररोज पाणी भरावे. पाण्याची ही छोटीशी व्यवस्था एखाद्या मुक्या पक्ष्याचा जीव वाचवू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे.