Crime News pudhari photo
बीड

Beed temple robbery : ब्रह्मगावच्या शृंगेरी देवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; ६४ हजारांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून त्यातील रोकडही चोरून नेली.

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील प्रसिद्ध शृंगेरी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करून देवीचे दागिने, मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. चोरट्यांनी सुमारे 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले असून, दानपेटीतील रोकड किती होती, याचा अद्याप निश्चित अंदाज आलेला नाही.

शृंगेरी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय मारुती हराळ (वय 52) यांनी आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंदिराच्या देखभालीसह सुरक्षेसाठी बाळू निकाळजे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

रविवारी (दि. 4 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता मंदिराचे पुजारी कल्याण निंबाळकर यांना मंदिराच्या गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय हराळ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर हराळ यांनी सरपंच रोहिदास पवार यांच्यासह मंदिरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

चोरट्यांनी मंदिरातून 15 हजार रुपये किमतीचे 12 बॅटेक्स अलंकार, चार हजार रुपये किमतीचे दोन बँॅटेक्स टोप, 40 हजार रुपये किमतीची चांदीची गणपतीची मूर्ती, तीन हजार रुपये किमतीच्या दोन पितळी मूर्ती आणि दोन हजार रुपये किमतीच्या बॅटेक्सच्या दोन नथी असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याशिवाय चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून त्यातील रोकडही चोरून नेली. दानपेटीत किती रक्कम होती, याचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही.

सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या केंद्रस्थानी

मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी संशयित हालचाली किंवा व्यक्ती आढळल्याची माहिती असून, पोलिसांकडून फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. चोरट्यांनी मंदिरात कोणत्या मार्गाने प्रवेश केला, चोरीनंतर कोणत्या दिशेने पलायन केले आणि त्यांच्या हालचाली कशा होत्या, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे.

मंदिर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शृंगेरी देवी मंदिरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याची चर्चा असल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धार्मिक स्थळी वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, रात्रीची निगराणी वाढविणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी विजय हराळ यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार विकास जाधव पुढील तपास करीत आहेत. चोरीचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT