आष्टी : शासकीय अनुदानावरील युरिया खताची बेकायदेशीररीत्या वाहतूक करून त्याची जास्त दराने विक्री अथवा औद्योगिक वापरासाठी अन्यत्र नेण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला. आष्टी तालुक्यातील आंभोरा ते घाटापिंप्री रस्त्यावर शनिवारी (८ ऑगस्ट) करण्यात आलेल्या कारवाईत २०० गोण्या युरिया खतासह ट्रक असा एकूण २२ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल रॉयल बाईटर्ससमोर संशयास्पदरीत्या जात असलेला ट्रक कृषी विभागाच्या पथकाने अडवला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ‘नर्मदा बायो केम’ कंपनीच्या युरिया खताच्या २०० गोण्या आढळून आल्या. प्रत्येक गोणीचे वजन ४५ किलो असल्याचे समोर आले.
या खताच्या वाहतुकीसंदर्भात आवश्यक अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याने कृषी विभागाने संपूर्ण साठा आणि ट्रक ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २२ लाख ५३ हजार २०० रुपये असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
हा खतसाठा व ट्रक अमोल कांतीलाल तळेकर (रा. घाटापिंप्री) यांच्या मालकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. शासकीय अनुदानावर उपलब्ध होणारे युरिया खत शेतकऱ्यांसाठी असताना ते बेकायदेशीररीत्या जास्त दराने विक्री करण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी अन्यत्र नेले जात असल्याचा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल या प्रकरणी गुण नियंत्रण अधिकारी नागसेन शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक मालक अमोल तळेकर यांच्याविरुद्ध रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ चे कलम २६(१)(अ)(ब), जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३(१)(अ)(ii), फर्टिलायझर मुव्हमेंट कंट्रोल ऑर्डर १९७३ चे कलम ३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१९(४) नुसार आंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला ट्रक आणि युरिया खताचा साठा पुढील तपासासाठी आंभोरा पोलिस ठाण्यात नेण्यात आला असून, या खताच्या बेकायदेशीर वाहतुकीमागील नेमका उद्देश आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
माहिती मिळताच भरारी पथकाची कारवाई
तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आणि गुण नियंत्रण निरीक्षक नागसेन शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा भरारी पथक प्रमुख सय्यपा गरंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वल्लभ भोसले यांच्यासह पथकाने शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद बीड सहिल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.