खळवट निमगावमध्ये सशस्त्र दरोडा pudhari photo
बीड

Beed Armed Robbery : खळवट निमगावमध्ये सशस्त्र दरोडा

दोन घरांत धाडसी लूट; आठ तोळे सोने व लाखोची रोकड लंपास

पुढारी वृत्तसेवा

वडवणी: वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथे मध्यरात्री पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत दोन घरांमध्ये धुमाकूळ घातला. चाकू, कोयता व लोखंडी रॉड च्या धाकावर कुटुंबियांना धमकावत दरोडेखोरांनी अंदाजे आठ तोळे सोने आणि सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांची रोकड लंपास केली. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गृहस्थास मारहाण करण्यात आली असून ते जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी प्रथम अभिमान मारुती राऊत यांच्या घराचे मुख्य गेट तोडून आत प्रवेश केला. घरातील सदस्य झोपेत असताना शस्त्रांचा धाक दाखवत कपाट उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर कपाटातील अंदाजे साडेसहा तोळे सोने आणि 1 लाख 24 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला.यानंतर टोळीने हरीभाऊ दिगांबर राऊत यांच्या घराकडे मोर्चा वळवला. येथेही दडपशाही करत कपाटातील सुमारे दोन तोळे सोने चोरून नेण्यात आले.

दरम्यान, हरीभाऊ राऊत यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड, हेडकॉन्स्टेबल विलास खरात व अन्य कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकास पाचारण करण्यात आले असून पुरावे संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गावात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT