Crime News Pudhari Photo
बीड

Beed Crime: खून करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या दोघांना बेड्या

अंजनवती अपघात प्रकरण, नेकनूर पोलिसांनी केला उलगडा

पुढारी वृत्तसेवा

नेकनूर ः नेकनूर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या अंजनवती येथील युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी अंजनवती रस्त्यावरील नाल्यात आढळून आला या ठिकाणी अपघात भासवण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. मात्र गमजाने गळा आवळून खून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने नव्याने दाखल झालेल्या एपीआय मंगेश साळवे यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत आरोपींना तीन दिवसांत पनवेल येथून जेरबंद केले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सपोनि मंगेश साळवे यांनी दिली.

अंजनवती येथील मजुरीचे काम करणारा 27 वर्षीय युवक किरण बंडू सोनवणे पत्नीला सांगून लिंबागणेशला रविवारी सायंकाळी गेला होता मात्र तो परतला नाही सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह अंजनवती रस्त्यालगत असलेल्या नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गंभीर व संवेदनशील प्रकरणाचा अवघ्या 03 दिवसांत उलगडा करण्यात नेकनूर पोलिसांना यश प्राप्त झाले.

विशेष बाब म्हणजे, आरोपींनी हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस सुगावा उपलब्ध नव्हता आणि प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे बनले होते.मयताचा मृतदेह त्याचे वाहनासह रस्त्यालगत आढळून आल्याने प्रथमदर्शनी अपघात झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष यामध्ये विसंगती आढळून आल्याने नेकनूर पोलिसांनी तपास अधिक बारकाईने सुरू ठेवला.

तांत्रिक विश्लेषण, शास्त्रोक्त तपासपद्धती आणि विविध पुराव्यांची सांगड घालत हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने परिश्रम घेत घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, लोकेशन विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचे सखोल विश्लेषण करीत नेकनूरमध्ये नव्याने आलेले एपीआय मंगेश साळवे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून आरोपीचा शोध घेतला दशरथ परदेशी, धीरज येडे या दोघांना तळोजा , पोलिस स्टेशन पनवेल येथून ताब्यात घेतले.

आरोपींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

तपासादरम्यान आरोपींनी पुरावे नष्ट करून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी प्रत्येक धागा तपासून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, बीड, तळोजा पोलिस स्टेशन पनवेल येथील सपोनि नीलेश येवले व त्यांचे पथक, टेक्निकल सेलचे विकी सुरवसे तसेच इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले. संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात यश आले व त्यांना तळोजा, पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात नेकनूर पोलिस स्टेशनचे सपोनि मंगेश साळवे यांच्या टीमला यश आले. यासाठी एएसआय संजय गुंड, पो.ह. दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, बालाजी ढाकणे, सुधाकर जायभाये यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT