An inter-state gang committed a theft at a cloth shop in Parli!
परळी, पुढारी वृत्तसेवा
परळी वैजनाथ येथील गांधी मार्केट मधील रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दीड लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७१ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. या टोळीचे राजस्थानमधील अजमेर येथील चोरीच्या गुन्ह्यांशीही संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास परळीतील गांधी मार्केट परिसरातील 'अजय कलेक्शन' या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.
याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३) आणि ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे १४ ऑक्टोबर रोजी पाटोदा येथून अकबर लुकमान खान (वय ३२, रा. जळगाव) आणि परवेज मेहमूद सय्यद (वय २२, रा. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले, चौकशीदरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ नोटा आणि १०० रुपयांच्या चार नोटा, अशी एकूण ७१ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
या प्रकरणातील मोईन बादशहा शेख (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) आणि अशपाक सबीर खान (रा. पाचोरा, जि. जळगाव) हे दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या पथकाने केली. अटक आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.