Amol Khune pudhari photo
बीड

Amol Khune : मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांची परदेशात मालमत्ता

अमोल खुणे यांचा आरोप; गंगाधर काळकुटेंकडे बॅनर्स लावण्यासाठी पैसे कोठून आले?

पुढारी वृत्तसेवा

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या परदेशात मालमत्ता आहेत, याची चौकशी करावी. गंगाधर काळकुटे यांच्याकडे बीडपासून ते मुंबईपर्यंत बॅनर्स लावायला पैसे कोठून आले, या सर्व आंदोलनाला कोण पैसे पुरवत होते. असा सनसनाटी आरोप करत अमोल खुणे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसेच जरांगे यांचे सगळे प्रकार आता उघडे पडले आहेत, असे खुणे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे आरोप होत आहेत. यानंतर जरांगे यांनी तब्बल पाचशे कोटी माझ्या नावावर आणल्याची दावा करणारी एक ऑडिओ क्लिप समोर आणली. त्यावर जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी प्रतिक्रया दिली आहे.

जरांगे यांनी लोकांना भुलवण्याचे उद्योग बंद करावेत, त्यांचे सगळे प्रकार उघडे पडले आहेत, त्याची चर्चा होऊ नये म्हणून ही जुनी क्लिप त्यांनी पुढे आणली आहे. ही क्लिप २०२४ पासून माझ्याकडे आहे, त्यांनी अकरा वाजता माध्यमांना दिली, त्यापूर्वीच माझ्या सोशल मीडियातून मी आठ वाजताच दिली होती, असा दावा खुणे यांनी केला आहे.

पाटोदा येथे आंदोलन थांबणार असेही आपण दोन दिवस आधीच सांगितले होते, त्यानुसार ते आंदोलन पाटोद्यातच संपल्याची आठवण खुणे यांनी करून दिली. आता या सर्व आंदोलनाला कोण पैसे पुरवत होते, हे समोर आले पाहिजे असे खुणे यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांत आणखी एक ऑडिओ क्लिप

जरांगे यांच्यापेक्षा जास्त ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. त्यांनी एखादी क्लिप आणायच्या आधीच मी माझ्याकडची क्लिप समोर आणणार आहे. आणखी दोन दिवसांत जरांगे यांच्या एका सहकाऱ्याची ऑडिओ क्लिप व त्याने काय काय उद्योग केले आहेत, हे सर्वांसमोर आणणार असल्याचा दावाही अमोल खुणे यांनी केला आहे.

जरांगे यांच्‍या सहकाऱ्यांची चौकशी करावी

जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्ता या देशात आणि परदेशात देखील आहेत, तीन वर्षांपासून हा खेळ सुरू आहे असेही खुणे यांनी म्हटले आहे. एखाद्या आमदाराला मतदारसंघात बॅनर लावताना दमछाक होते, तर गंगाधर काळकुटे हे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत बॅनर लावतात, हे नेमके काय ? यासाठी पैसे कोण पुरवते? असा सवाल खुणे यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व सत्य समोर आणावे. जनतेला भावनिक करून आजवर जरांगे यांनी आंदोलन सुरू ठेवले, परंतु आता पाचशे कोटींच्या क्लिपसह जरांगे यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी खुणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT