अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत तीन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रा. ममता राठी जळीत प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले असून, हा प्रकार घातपाताचा नसून मानलेल्या भावाला आत्महत्येपासून वाचवताना घडलेला दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः जखमी अवस्थेत दिलेल्या कबुली जबाबातून प्रा. ममता राठी यांनीच या घटनेची सविस्तर माहिती दिल्याने शहरात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
अंबाजोगाई येथील नामांकित महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) (रा. पिताजी माऊली नगरी, अंबाजोगाई) या सध्या लातूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, 80 टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 4 जानेवारी रोजी त्यांचे सहकारी व मानलेले भाऊ धनाजी आर्य यांनी प्रा. ममता राठी यांना फोन करून महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणामुळे मानसिक तणावात असल्याचे व आता जगण्याची इच्छाच उरली नसल्याचे सांगितले. भावाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच प्रा. राठी यांनी क्षणाचाही विलंब न करता जवळगाव फाटा गाठला.
तेथे धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच प्रा. ममता राठी यांनी धाडसाने त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत डिझेल त्यांच्या अंगावर सांडले. ममता यांनी धनाजीच्या हातातील काडीपेटी फेकून दिली; मात्र दुर्दैवाने त्यांच्या अंगावरील कोटाला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने भडका उडाल्याने प्रा. राठी गंभीररीत्या भाजलेल्या गेल्या.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व धनाजी आर्य यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न करून प्रा. राठी यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
या संपूर्ण घटनेचा सविस्तर जबाब प्रा. ममता राठी यांनी बर्दापूर पोलिसांकडे दिला असून, त्यानुसार हा अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानलेल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिकेच्या जीवावर बेतलेला हा प्रसंग संपूर्ण अंबाजोगाई शहरासह शैक्षणिक क्षेत्रासाठी हादरवून टाकणारा ठरला असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केल्या जात आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात तीव्र हळहळ
प्रा. ममता राठी या वाणिज्य विषयात पीएचडी प्राप्त उच्च विद्याविभूषित प्राध्यापिका असून, विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. विषय सहज-सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची खास ओळख आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले असून, त्याद्वारे नियमित शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. या चॅनलला हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला आहे.