Beed electric shock accident pudhari photo
बीड

Beed electric shock accident : विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू

ऐन सणासुदीत अंबाजोगाईत घडली घटना; मशीन चालकाला घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

अपघात घडल्यानंतर गंभीर अवस्थेत दोघांना स्वामी रामानंद तीर्थ (स्वा.रा.ती.) रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ऐन सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह परिसरात अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत उर्फ खंडू कोंडीराम वाघमारे (वय ३३) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०, दोघेही रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई) अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत.

दररोजप्रमाणे कामावर जातो असे घरात सांगून अत्यंत आनंदाने सकाळी डबा घेऊन निघालेल्या या कष्टकरी मजुरांवर दुपारी अचानक काळाने झडप घातली. मृत यशवंत वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुमारे दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार यशवंत यांच्यावरच होता.

घरातील एकमेव कमावत्या पुरुषाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वाघमारे कुटुंबीय पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. तर दुसरीकडे मृत बबन वाघमारे हे अत्यंत निष्णात ड्रायव्हर होते. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाल्याने ते सुट्टीच्या दिवशी सेंटरिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार असून त्यांच्याही अचानक जाण्याने कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेला आहे. मंगळवार पेठेतील दोन कष्टकरी तरुणांचा एकाच वेळी असा अंत झाल्याने चांभार गल्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घडलेल्या घटनेच्या तपशील नुसार मुख्य रस्त्यावरील भिसे यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब भरण्याचे काम चालू होते. या कामासाठी काँक्रीट मिक्सरची मोठी मशीन लावण्यात आली होती. ज्या ठिकाणी हे काम सुरू होते, अगदी तिथूनच ३३ केव्ही आणि स्ट्रीट लाईट अशा दोन मुख्य विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित न करता आणि कोणतीही सुरक्षेची योग्य खबरदारी न घेता काम सुरू ठेवण्यात आल्यानेच हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरक्षेच्या उपायांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे दोन निष्पाप कामगारांचा बळी गेल्याने स्थानिक नागरिकांमधून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्वा.रा.ती. रुग्णालयामध्ये मृतांचे नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती अत्यंत शिताफीने हाताळली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी काँक्रीट मशीनचा चालक विश्वनाथ चव्हाण (रा. झारखंड) यास ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT