अंबाजोगाई : शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबाजोगाई येथे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत तिच्याकडून लाखो रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी अंबाजोगाई येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. याच दरम्यान तिची ओळख महेश करपे (रा. धारूर) आणि पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोघांशी झाली. ओळखीचे रूपांतर विश्वासात झाले; मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी तरुणीला जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी महेश करपे याने तरुणीला खाण्यासाठी दिलेल्या खाद्यपदार्थामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आरोपींनाही अशाच प्रकारे तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या घटनांचे फोटो आणि व्हिडिओ आरोपींनी काढून ठेवले होते. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत आरोपींनी तरुणीला सतत मानसिक दबावाखाली ठेवले.
या भीतीपोटी पीडितेकडून वेळोवेळी तब्बल तीन लाख रुपयांची रोकड आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे.अखेर हा छळ असह्य झाल्यानंतर तरुणीने आपल्या नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला आणि अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधवर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
वाढत्या घटनांमुळे चिंतेत भर
गेल्या काही वर्षांत मैत्री, प्रेमसंबंध किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून तरुणींना जाळ्यात ओढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विश्वास संपादन करून गुंगीचे औषध देणे, गुप्तपणे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, हा गुन्हेगारांचा नवा ट्रेंड बनत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
समाजासाठी इशारा
ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नसून समाजासाठी गंभीर इशारा आहे. विश्वासाच्या नात्यांचा गैरवापर करून तरुणींना लक्ष्य करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालक, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांनीही सतर्क राहून अशा घटनांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे.
तरुणींनी कोणती काळजी घ्यावी?
अनोळखी किंवा नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीकडून खाद्यपदार्थ किंवा पेये स्वीकारताना सतर्कता बाळगावी. वैयक्तिक माहिती, फोटो किंवा खासगी बाबी सहजपणे कोणासोबतही शेअर करू नयेत. संशयास्पद वर्तन, पाठलाग किंवा दबाव जाणवल्यास तातडीने कुटुंबीय व पोलिसांशी संपर्क साधावा. ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्वरित कायदेशीर मदत घ्यावी. शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आपले लोकेशन आणि हालचालींबाबत कुटुंबीयांशी नियमित संपर्क ठेवावा.