SC Reservation Sub Categorization
अंबाजोगाई : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अंबाजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा हजारांहून अधिक अनुयायी या मोर्चात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे शहरात निळे वादळ पाहायला मिळाले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने, अॅड. सुरेश माने, बब्रुवाहन पोटभरे, रुक्मिणबाई लोंढे, रोहिदास बनसोडे, डी. एस. नरसिंगे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्मकार समाजातील ढोर, चांभार आणि मोची समाजबांधवांनीही मोर्चात सहभाग घेतला.
मोर्चाला संबोधित करताना डॉ. आनंदराज आंबेडकर यांनी आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. “उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवली नाही, तर देशभरातील भीमसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन सुरूच ठेवतील,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच भीमा कोरेगावचा इतिहास विसरू नका, असे आवाहन करत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
कृती समितीने उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, समितीचा अहवाल तातडीने जाहीर करणे, अनुसूचित जातीतील सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरती करणे, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याच्या मागण्या केल्या आहेत.
आरक्षणाचे विभाजन नको, सामाजिक न्याय हवा” या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चासाठी अंबाजोगाई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विविध संघटनांकडून सहभागींसाठी पाणी, शरबत, फळाहार आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.