Amarsingh Pandit's disclosure has given a new twist to the discussion in the graduate constituency
शशी केवडकर
बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले असून, चौथ्यांदा त्यांनाच संधी मिळणार की माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाचा विचार होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
अमरसिंह पंडित यांचे नाव इच्छुक म्हणून चर्चेत येत असतानाच त्यांनी स्वतः पुढे येत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सतीश चव्हाण यांच्या पाठीशी असून, समर्थकांनी समाजमाध्यमांवर सुरू असलेला संभ्रम थांबवावा, असे आवाहन पंडित यांनी केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सतीश चव्हाण यांनी २०२० मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी त्यांच्या उमेदवारीकडे विशेष राजकीय लक्ष लागले आहे.
गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाची मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू होती. समाजमाध्यमांवर त्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीच्या संदर्भात प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे पंडित यांना पक्षाकडून संधी मिळणार का, याबाबत राजकीय चर्चाना वेग आला होता. दरम्यान, महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीवरही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पंडित यांनी स्वतःच भूमिका स्पष्ट केली.
आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली नाही किंवा पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे समाजमाध्यमांवरील चर्चेला आधार काय, असा प्रश्न उपस्थित करत समर्थकांनी संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा थांबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. अमरसिंह पंडित यांनी सतीश चव्हाण यांच्या तीन टर्मच्या प्रतिनिधित्वाचा उल्लेख करत त्यांच्या मतदारसंघातील संपर्काचा दाखला दिला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची भौगोलिक आणि मतदारसंख्येची व्याप्ती मोठी असून, चव्हाण यांनी या मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला असल्याचे पंडित यांनी म्हटले आहे.
पक्षाकडून चव्हाण यांच्या चौथ्या टर्मच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे ही औपचारिकता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सतीश चव्हाण यांच्या सलग तीन टर्मच्या प्रतिनिधित्वानंतर यावेळी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी चर्चा काही कार्यकत्यांच्या पातळीवर सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः अमरसिंह पंडित यांची स्वच्छ प्रतिमा, संघटनात्मक संपर्क आणि गेवराईतील राजकीय प्रभाव यामुळे त्यांच्या नावाला चर्चेत महत्त्व मिळाले होते. मात्र, या चर्चेला पंडित यांच्या स्वतःच्या खुलाशामुळे वेगळे वळण मिळाले आहे.
राष्ट्रवादीतील एका कार्यकर्त्याची भूमिका
"सतीश चव्हाण यांना सलग तीन वेळा संधी मिळाली आहे. त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांना यावेळी नेतृत्वाने नव्या चेहऱ्याचा विचार करावा, असे वाटते. अमरसिंह पंडित यांचे नाव पुढे आल्याने ही चर्चा अधिक तीव्र झाली होती. मात्र, पंडित यांनी स्वतःच चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केल्याने आता पक्षाचा अधिकृत निर्णय काय होतो, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. "पंडित यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला तात्पुरता विराम मिळाला असला, तरी सतीश चव्हाण यांच्या चौथ्या टर्मच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा, पक्षातील अंतर्गत समीकरणे आणि महायुतीतील जागावाटप यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील राजकारण आणखी रंगण्याची शक्यता आहे.
मी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची कोणतीही तयारी केलेली नाही किंवा पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही. समाजमाध्यमांवरील चर्चेमुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम दूर करावा. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, हीच माझी भूमिका आहे."- अमरसिंह पंडित, माजी आमदार