बीड: जिल्ह्यात मागील काही कळत तुम्ही चुकीचे पायंडे पडले आहेत. ते आधी बंद करा, मला बेशिस्त चालत नाही, तुमच्यावर जर कोणी दबाव आणून चुकीचे काम करून घेत असतील. तर माझ्याशी संपर्क साधा मी उपलब्ध आहे. मात्र, कोणतेही चुकीचे काम खपवून घेणार नाही, असा सज्जड दम राज्याचे उपुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.३०) बैठकीत सर्वांनाच दिला.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील, लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती होती.
पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अशा घटना होत राहिल्या तर उद्योगपती येऊन इथे गुंतवणूक करणार नाहीत. त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून जिल्ह्याची बदनामी थांबवून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावे, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणावर असल्याने पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारखे चांगले प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे असे प्रकल्प येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे. मुंबई-बीड रेल्वे सुरु करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार आहे. या रेल्वेमार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण झालेले आहे. प्रत्येक तालुका आपला आहे. ही भावना तुमच्या मनात का येत नाही? कुठे चांगलं काम होत असेल तर त्याची स्पर्धा झाली पाहिजे.” असं पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. डॉक्टर, व्यापारी आणि समाजातल्या विविध प्रतिनिधींची बैठक मी पुढे घेणार आहे. पत्रकार, साहित्यिक, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे. चांगल्या इमारती कशा उभ्या करता येतील, हे बघावं लागेल. विविध योजना, विकासकामे, पाण्याचे, स्वच्छतेचे प्रश्न सोडवले जाणार आहे. मंत्रिमंडळातले दोन सहकारी आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना विश्वासात घेऊन आणि कुठलाही भेदभाव न करता आपल्याला पुढे जायचं आहे. अधिकाऱ्यांना सल्ला देताना तुम्ही ही कुठलाही भेदभाव करायचा नाही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही बांधील आहात. त्यामुळे तुम्ही कुणासाठी पायघड्या घाला आणि कोणाला बाहेर ताटकळत ठेवले. तर अजित पवारशी गाठ आहे, हे लक्षात ठेवा.
जवळपास तीन तासांच्या बैठकीत अजित पवार यांनी कुठेही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भाष्य केले नाही. बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना न भेटताच त्यांचा ताफा सरळ हेलिपॅडकडे रवाना झाला.