

पुणे: अभिनेता सैफ अली खान अभिनय करतोय, असा कोणताही पुरावा पोलीस तपासात अद्याप तरी पुढे आलेला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील पुरस्कार वितरण समारंभाला जाण्यापूर्वी पुण्यातील सर्किट हाऊसवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्याचे मत्स्य विकासमंत्री नितेश राणे यांनीच अशी शंका व्यक्त केली असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच, ते म्हणाले की, राणे यांची कालच भेट झाली. परंतु, त्यावेळी या संदर्भात काही चर्चा झाली नाही.
तथापि, असे काही असेल तर पोलीस तपासात ते नक्की पुढे येईल. सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी नागरिक असून, मुंबईबद्दल असणार्या आकर्षणामुळे ती व्यक्ती मुंबईत आली होती. बांगलादेशला परतण्यासाठी पैसे उरले नसल्याने चोरीच्या उद्देशाने तो सैफ अलीच्या घरात शिरला व त्याने त्यांच्यावर हल्ला केला, असेही पवार यांनी सांगितले.