Beed district administration Issues
गौतम बचुटे
केज : उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक खमक्या आणि प्रशासनावर पक्कड असलेले उपमुख्यमंत्री आहेत. ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील ढेपाळलेली यंत्रणा आणि सुस्त प्रशासन सुतासारखे सरळ होईल, असा प्रत्येकाला विश्वास होता. परंतु, बीड जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि यंत्रणा पालकमंत्री यांना जुमानत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या पत्राला देखील किंमत देत नाहीत. यामुळे आता अजित पवार यांनी बडगा उगारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
केज तालुक्यातील एका प्रकरणी निलंबित झालेले तलाठी किसन देशमुख यांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता करून त्यांचा निलंबन काळ हा कर्तव्य काळ समजून वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर सुमारे पंधरा वर्ष उलटले आणि त्या नंतर तो कर्मचारी सेवा निवृत होऊन साडेचार वर्ष झाली तरी त्याच्या निलंबन काळातील वेतन व भत्ते मिळालेले नाहीत. जिल्हा रोहयो विभागातील अधिकाऱ्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखविली आहे.
याची दखल घेऊन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यासन अधिकारी, नियोजन विभाग (रोहयो) यांना पत्र दिले आहे. मात्र, त्याला देखील संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही.
कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर आणि दोषमुक्त झाल्या नंतरही त्यांचे वेतन आणि भत्ते मिळत नसतील आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आणि खासदार बजरंग बप्पा सोनवणे असतानाही जर न्याय मिळत नसेल, तर मग लोकप्रतिनिधींनी त्यांना ताळ्यावर आणायला हवे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फाईल आणि प्रस्ताव तपासून त्याबाबत वरिष्ठांच्या परवानगीने उचित कार्यवाही करण्यात येईल.श्रीमती देशमुख, लिपिक, जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो विभाग, बीड)