Beed Accident News : दिंडीहून माघारी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात file photo
बीड

Beed Accident News : दिंडीहून माघारी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात

केज-कळंब मार्गावरील घटना : एक ठार, अकरा जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

Accident involving vehicle of Warkari pilgrims returning from Dindi

गौतम बचुटे,

केज: साळेगाव येथे केज कळंब दरम्यान वाशिम जिल्ह्यातील दिंडीचे ट्रॅक्टर, एक क्रुझर आणि कारच्या झालेल्या विचित्र भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास खामगाव सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी वर केज ते कळंब दरम्यान साळेगाव येथील रामेश्वर कळसकर यांच्या चार्जिंग स्टेशन जवळ घडली.

वाशिम जिल्ह्यात संत राघोजी महाराज संस्थान बोराळा येथील ह.भ. प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांच्या परतीच्या मार्गाने केजच्या दिशेने वारकऱ्यांचा ट्रॅक्टर जात होता. या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या क्रुझरने जोराची धडक दिली. या दोन वाहनांची धडक होताच याच रस्त्याने जात असलेली एक कार अपघातग्रस्त वाहनावर येऊन धडकली. ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार या तीन वाहनाचा तिहेरी अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टरचे हेड तुटून त्याचे दोन भाग झाले. अपघात दिंडीतील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून परतीच्या मार्गाने वाशीमकडे जात असलेल्या एका वृद्ध वारकऱ्यांचा अंबाजोगाई येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला.

तर सात वारकरी जखमी झाले आहेत. तसेच क्रूझर मधील चौघे जखमी झाले आहेत. आठ जणांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविले आहे. तर इतर चौघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान हा अपघात गावाजवळ झाला. ही माहिती मिळताच गावकरी तात्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. आणि जखमींना मदत केली. रात्री उशिरापर्यंत मयत आणि जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. मात्र अपघातात मृत्यू झालेले वृद्ध इसम आणि जखमी हे वाशिम जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसही घटनास्थळी हजर

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर आणि त्यांचे सहकारी अपघातस्थळी हजर झाले. अपघातातील जखमींना तीन रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविल्या नंतर अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT