आरोग्य साथींनी जपले ऊसतोड मजुरांचे आरोग्य ! file photo
बीड

Beed News : आरोग्य साथींनी जपले ऊसतोड मजुरांचे आरोग्य !

पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकात करताहेत सेवा; बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

'Aarogya Saathi' (Health Companions) have safeguarded the health of sugarcane cutters!

उदय नागरगोजे

बीड : बीड जिल्ह्यातून लाखो ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जातात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात तब्बल 1146 आरोग्य साथी निवडण्यात आल्या होत्या. यातील ज्या आरोग्य साथी ऊसतोडीसाठी गेल्या, त्या मजूरांना आरोग्य सेवा देत आहेत. तसेच बीड जिल्ह्यात देखील ऊसतोड मजुर महिलांच्या आरोग्याची काळजी जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. याकरिता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांनी आरोग्य विभागाला तत्परतेने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या प्रश्नावर विविध उपाययोजना दरवर्षी केल्या जातात. यावर्षी आरोग्य विभागाने ऊसतोड मजुर कुटूंबातीलच 1 हजार 146 महिलांना आरोग्य साथी म्हणून निवडले जाते. या महिलांना प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण देवून आवश्यक वैद्यकीय किट उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या यामुळे फडावर काम करतांना होणाऱ्या लहान मोठ्या दुखापती, सर्दी-ताप यासारख्या आजारावर हे आरोग्य साथी जागेवरच प्राथमिक उपचार देण्याचे काम करत आहेत. तसेच गंभीर आजार किंवा अधिक उपचाराची गरज भासल्यास रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्राशी जोडून देण्यासाठी 108 व 102 रुग्णवाहिका संदर्भ सेवा देण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत

या मोहिमेत ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर विशेष भर दिला जात आहे. गरोदर मातांची तपासणी, स्वच्छता आणि इतर आरोग्यविषयक समस्यांबाबत महिलांमध्ये जनजागृती करुन त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी या आरोग्य साथी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात ऊस गाळप हंगामात साखर कारखाने व तात्पुरत्या वस्त्यांवर स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची आरबीएसके पथकामार्फत जन्मजात दोष, आजार, पोषण कमतरता व विकासात्मक विलंब या चार निकषानुसार तपासणी करुन त्यांना तत्काळ उपचार व संदर्भसेवा दिल्या जात आहेत.

तसेच प्रत्येक गर्भवती महिलेची घरभेटीद्वारे नोंदणी करुन प्रसूतीपूर्व तपासणी, रक्त व इतर आवश्यक चाचण्या, लसीकरण आणि मोफत औशधे उपलब्ध करुन दिली जात आहेत. उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात असून प्रसुतीसाठी 102 व 108 रुग्णवाहिका सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत एकही बालक व गर्भवती महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ व जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT