Dharur Accident : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नीसह दोन चिमुकले जखमी File Photo
बीड

Dharur Accident : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नीसह दोन चिमुकले जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

A vehicle in Ajit Pawar's convoy hits a two-wheeler, husband and wife, two children injured

धारूर, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. २२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तेलगाव धारूर रस्त्यावरील धुनकवाड फाटा येथे घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी माजलगाववरून धारूर मार्गे केजकडे जात होते. त्यांचा ताफा भरधाव वेगात असताना धुनकवाड फाटा परिसरात ताफ्यातील शेवटच्या अग्निशमन दलाच्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहनही रस्त्यावर पलटी झाले, ज्यामुळे त्यातील कर्मचारीही जखमी झाले आहेत.

अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम विष्णू सुदे आणि त्यांची दोन लहान मुले हे चौघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने प्रथम धारूर येथील रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ताफ्याचा अतिवेग, अरुंद रस्ता की समोर आलेली दुचाकी, नेमक्या कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याचा तपास धारूर पोलिस करत आहेत.

पालकमंत्र्यांच्या ताफ्याला अपघात; आता तरी रस्ता रुंद होणार का?

तेलगाव ते धारूर हा राष्ट्रीय महामार्ग धुनकवाड ते घाटापर्यंत अत्यंत अरुंद आहे. येथे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर आतापर्यंत शेकडो अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, आज खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा याच अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत असून, अजित पवार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या जीवघेण्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT