A minor girl was sexual harassment in Kaij taluka.
केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊस तोडणीसाठी आपल्या मोठ्या बहिणी सोबत आलेल्या एका १२ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचाराचा कळस करून तिचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकिस आली आहे.
एका अल्पवयीन मुलीची आई ही भोळसर स्वभावाची असून तिचे वडील कर्नाटक या परराज्यात ऊस तोडणीसाठी गेले आहेत. ती मुलगी ६ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. वडील ऊस तोडणीसाठी परराज्यात गेले असल्याने ती मुलगी तिच्या ऊसतोडणी मजूर म्हणून कामासाठी केज तालुक्यात भालगाव येथील ऊस तोड मजुरांच्या शेतातील वस्तीवर विवाहित बहिणी सोबत राहात होती. तिच्या बहिणी आणि मेव्हण्याने धारूर तालुक्यातील ऊसतोड मुकादम यांची उचल घेतली असल्याने ते केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या तालुक्यातील भालगाव येथे काम करीत होते.
दि. १५ डिसेंबर सोमवार रोजी रात्री सर्वजण ऊसाच्या शेतात असताना अल्पवयी मुलगी एकटीच त्यांच्या वस्तीवर असलेल्या कोपीवर होती. ही संधी साधून आर ोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय (३४ वर्ष) (रा. सोमनाथ बोरगाव ता. अंबाज गाई) हा तेथे गेला आणि त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारा नंतर घाबरलेल्या त्या अल्पवयीन मुलीने ही घटना तिची बहीण घरी वस्तीवर आल्या नंतर तिला सांगितली.
त्या नंतर तिला घेऊन तिची बहीण ही युसुफवडगाव पोलिस ठाण्यात हजर झाली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले भिमराव मांजरे यांनी या गंभीर गुन्ह्याची माहिती व्यंकट राम आणि मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली. अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारी वरून नराधम लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे याच्या विरुद्ध पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला जेरबंद करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते.
बसस्टँड परिसरात आरोपीच्या आवळल्या मुसक्या
गुन्हा केल्या नंतर आरोपीला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. मिळताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिस निरीक्षक भीमराव मांजरे, पोलिस उपनिरीक्षक भारत वरडे, पिंक पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश शेळके, पोलिस कॉन्स्टेबल भागवत निरडे आणि युसुफवडगाव ठाण्याचे कर्मचारी यांनी नराधम आरोपीच्या मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला.
त्याचे मोबाईल लोकेशन हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे असल्याचे निष्पन्न होताच आरोपी एसटीने फरार होऊ शकतो असा अंदाज काढून पोलिस बस स्टँडच्या परिसरात दबा धरून बसले. आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे हा दि. १७ डिसेंबर बुधवार रोजी दुपारी ४:३० वा. च्या सुमारास कळंब बस स्टँडवर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला केज न्यायालयात हजर केले असता घटनेचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने त्याला दि. २२ डिसेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.