Beed News : अनधिकृत बांधकामाविरोधात नगरपालिकेसमोर उपोषण File Photo
बीड

Beed News : अनधिकृत बांधकामाविरोधात नगरपालिकेसमोर उपोषण

माजलगाव येथील खान कॉम्पलेक्ससंदर्भात शेख शाकेर यांची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

A hunger strike was held in front of the municipality against unauthorized construction.

माजलगाव, पुढारी वृत्तसेवाः सोळंके महाविद्यालयासमोर उभारण्यात आलेल्या खान कॉम्प्लेक्समधील नियमबाह्य व बेकायदेशीर बांधकाम हटविण्याच्या मागणीसाठी शेख शाकेर यांनी आज माजलगाव नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

माजलगाव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. ३८५, गट क्र. २४५ येथील मालमत्ता क्र. २६/१३३९ वर फेरोज खान शाहेद यांच्याकडून उभारण्यात आलेल्या खान कॉम्प्लेक्सचे बांधकाम नगर परिषदेने मंजूर केलेल्या नकाशानुसार नसल्याचा आरोप उपोषणकत्यांनी केला आहे. बांधकाम परवाना घेताना नकाशामध्ये पार्किंग दाखविण्यात आले; मात्र प्रत्यक्षात त्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्यात आले असून कॉम्प्लेक्ससमोरील जिन्याचेही नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

हा कॉम्प्लेक्स वर्दळीच्या ठिकाणी, महाविद्यालयासमोर असल्याने येथे विद्यार्थ्यांसह नागरिक व वाहनांची मोठी गर्दी असते. पार्किंग क्षेत्रात गाळे उभारल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून काही वेळा अपघातही घडत असल्याचा आरोप आहे. सध्या या कॉम्प् लेक्समध्ये हॉटेल्स, मॉल व होलसेल व्यवसाय सुरू असल्याने गर्दीचे प्रमाण अधिक वाढले आहे.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हा कॉम्प्लेक्स 'स्पेशल बिल्डिंग' प्रकारात मोडत असताना चोहीबाजूंनी आवश्यक असलेले ६ मीटर साइड मार्जिन ठेवलेले नाही. तसेच दोन स्वतंत्र प्रवेशद्वार, फायर सेफ्टी व्यवस्था, लिफ्ट आणि दिव्यांगांसाठी ये-जा करण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानीची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणी नगर परिषदेने तातडीने स्थळ पाहणी करून मंजूर नकाशानुसार पार्किंग क्षेत्रात उभारलेले गाळे व समोरील जिने पाडावेत, पार्किंग मोकळे करावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेख शाकेर यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले. मात्र या पत्राने समाधान न झाल्याने, ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेख शाकेर यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT