A father ends his life by killing his daughter in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा पत्नीशी वादानंतर रागाच्या भरात मुलीला घेऊन घराबाहेर पडत पतीने एकुलत्या एक मुलीचा खून केला, तर स्वतः गळफास घेतला. ही घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी उघडकीस आली होती.
जयराम शहादेव बोराडे (३३, रा. भाटसांगवी) असे पित्याचे तर अक्षरा बोराडे (३) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. जयराम याची पत्नी सध्या माहेरी औरंगपूर येथे आहे. किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये मंगळवारी भांडण झाले. यानंतर जयराम याने माझ्या मुलीला घेऊन जातो, असे म्हणत अक्षराला सोबत घेऊन घर सोडले.
त्यानंतर त्याचा मृतदेह इमामपूर रोडवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि बाळराजे दराडे, अतिश मोराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्या ठिकाणी बोराडे यांची मुलगी तसेच दुचाकीही आढळून आली नाही. यामुळे पोलिस तिचा दोन दिवसांपासून शोध घेत होते.
अखेर रामगड येथे गुरुवारी सकाळी अक्षराचा मृतदेह गळफास दिलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बोराडे यानेच मुलगी अक्षराला गळफास दिला अणि त्यानंतर इमामपूर शिवारात जाऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर अधिक तपास करत आहेत.
त्यामुळे जागा बदलली बोराडे हा औरंगपूर येथून मुलीला घेऊन निघाल्यानंतर रामगड परिसरात गेला. त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाला मुलगी अक्षराला गळफास दिला. तिच्या शेजारीच त्यालाही गळफास घ्यायचा होता, परंतु त्याचे पाय खाली टेकू लागल्याने तेथून दुचाकी घेऊन काढता पाय घेतला. यानंतर इमामपूर शिवारात गेला. त्या ठिकाणी त्याने गळफास घेतला.