A bill of Rs 90 thousand was sent to Cha-Hata Primary Health Center, which does not even have an electricity connection.
बीड : पुढारी वृत्तसेवा
बीड तालुक्यातील च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना वीज जोडणी अभावी प्रसुती, शस्त्रक्रिया, आंतररूग्ण विभाग या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होते. रूग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करून बीड येथे जावे लागते.
विजेअभावी रूग्णांची हेळसांड थांबावी म्हणून वीज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी डॉ.गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदने व आंदोलनाच्या माध्यमातून १० लक्ष रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घेतला. असे असताना एकीकडे त्याचे अद्याप काम सुरू नसताना आणि वीज जोडणी नसताना महावितरणचे तब्बल ९० हजार रुपये वीज बिल पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संबंधित प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.मदन काकड यांनी सहाय्यक अभियंता म. रा. वि. वि. कं.नवगण राजुरी बीड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र च-हाटा येथे अद्याप विद्युत जोडणी झालेली नसतानाही येत असलेल्या वीजबीला बाबत शहानिशा करून वीजबील येणार नाही याची दक्षता घ्यावी असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तरीही दर महिन्याला वीजबील येते आहे. हा आकडा ९० हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे एकंदरीतच आरोग्य विभाग कोमात आणि महावितरण जोमात असं म्हणण्याची वेळ आली असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या जलसमाधी आंदोलनानंतर वीज जोडणीसाठी १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर मात्र काम अद्याप सुरूच नाही :- डॉ.गणेश ढवळे
बीड तालुक्यातील च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य ईमारत आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने ८ वर्षांपूर्वी तब्बल ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली. सुरूवातीपासुनच वीज जोडणी अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. वीजजोडणीसाठी निधी देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, च-हाटा येथील शेख युनुस, सुदाम तांदळे, मनोज तांदळे, सुभाष बांगर, संपत नागरगोजे, सुर्यकांत नागरगोजे, हरिश्चंद्र जाधव, भगिरथ उबाळे, बप्पासाहेब पवार आदींनी दि.१४ आक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले होते.
त्यानंतर याची दखल सीईओ जिल्हा परिषद बीड आदित्य जीवने यांनी च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत व कर्मचारी निवासस्थान यांच्या विद्युतीकरणासाठी विद्युत रोहित्र बसविणे कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र अद्याप काम सुरूच करण्यात आले नाही. यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला यांचे गांभीर्य दिसून येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे यांनी दिली.