₹9 lakh repair work exists only on paper; school wall collapses in Theral
बीड, पुढारी वृत्तसेवा: पाटोदा तालुक्यातील थेराला येथील जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली मध्यरात्री कोसळल्याने ३०० विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही शाळा असून, ही दुर्घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेने केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणाच नव्हे, तर लाखो रुपयांच्या दुरुस्ती कामातील कथित भ्रष्टाचाराचा गंभीर संशय निर्माण केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या शाळेच्या दुरुस्तीसाठी तब्बल ९ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद असून, ग्रामपंचायतीने संबंधित कंत्राटदाराला पूर्ण देयकही अदा केले आहे. असे असताना काहीच कालावधीत वर्गखोलीची भिंत कोसळल्याने दुरुस्तीचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड झाले आहे. त्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात आला का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
थेराला येथील या शाळेत सुमारे ३०० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र प्रत्येक वेळी अधिकारी पाहणी करून निघून गेले, पण कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. अखेर मध्यरात्री वर्गखोलीची भिंत कोसळली आणि संपूर्ण यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला.
विशेष म्हणजे, ९ लाख रुपये खर्च करूनही भिंत कोसळते, याचा अर्थ कामात गंभीर त्रुटी किंवा निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचा संशय बळावला आहे. ग्रामपंचायत, संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणारे अधिकारी यांच्या संगनमताशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र हीच घटना शाळा सुरू असताना घडली असती, तर शेकडो विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून, निष्काळजीपणाची आणि कथित भ्रष्टाचाराची गंभीर परिणती असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाच्या
दैनिक पुढारीचे जि. प. प्रशासनाला थेट प्रश्न
९ लाख रुपयांच्या दुरुस्तीचे काम नेमके कोणत्या दर्जाचे झाले ?
काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कुणी दिले?
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला देयक कसे अदा करण्यात आले ?
संबंधित अभियंता, ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का?
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का ?
शाळेच्या दुरुस्तीसाठी ९ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते आणि कंत्राटदाराला पैसेही दिले गेले. मग एवढ्या लवकर भिंत कशी कोसळली? हा सरळसरळ निकृष्ट कामाचा आणि भ्रष्टाचाराचा नमुना आहे. घटना रात्री घडली म्हणून ३०० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. दिवसा घडली असती तर त्याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून चौकशी झाली पाहिजे.- संतप्त ग्रामस्थ, थेराला
चौकशीची जोरदार मागणी
थेराला येथील शाळेची भिंत कोसळण्याची घटना ही केवळ अपघात नसून सरकारी निधीच्या वापरातील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.