65 acres of Lakshminarayan temple land released from Attal family
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनींवरील अतिक्रमण व गैरव्यवहाराच्या मालिका उघड होत असताना, गेवराई तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टची तब्बल ६५ एकर जमीन भू-माफियांकडून मुक्त करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी दिलेल्या निर्णायक आदेशाने या प्रकरणी नवा इतिहास रचला आहे.
या निर्णयामुळे केवळ एक मंदिरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील देवस्थान संपत्तीच्या रक्षणासाठी नवा संदेश गेला आहे. ही जमीन बळकावण्यासाठी श्रीमती कौसाबाई बबन यांच्या नावाने बनावट फेरफार (नंबर ३२१) दाखल करण्यात आला होता. याच्या आध- ारे मंदिराच्या नावाची नोंद ७/१२ उताऱ्यावरून रद्द करण्यात आली, आणि अट्टल कुटुंबाकडे देवस्थान जमिनीचा ताबा गेला.
या फसवणुकीचा पाठपुरावा तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला. त्यांनी धर्मदाय उपआयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली. २५ मार्च २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत अट्टल यांनी फेरफार चुकीचा असल्याचे कबूल केले.
त्यानंतर जाधव यांनी फेरफार तत्काळ रद्द करून मूळ देवस्थानाच्या नावे नोंद पूर्ववत करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. शासनाने देवस्थान संपत्तीबाबत स्पष्ट परिपत्रक काढूनही, स्थानिक प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. 'रक्षकच भक्षक झाले आहेत,' अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांचा हा निर्णय केवळ प्रशासकीय आदेश नाही, तर भ्रष्ट साखळीला दिलेला ठोस संदेश आहे.
या आदेशामुळे देवस्थानांच्या नावाने जमिनी बळकावणाऱ्यांना आता चपराक बसण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थान संपत्ती वाचवण्यासाठी समाज, धर्मदाय विभाग यांनी एकत्र येऊन कारवाई केली नाही, तर अनेक पवित्र ठिकाणांच्या जमिनी पुढील काही वर्षांत इतिहासजमा होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक वर्षे अट्टल कुटुंब मंदिराच्या जमिनीवर शेती करत होते आणि त्या उत्पन्नावर स्वतःचा हक्क सांगत होते. देवस्थानच्या निधीचा दुरुपयोग आणि मंदिराच्या नावाने मिळणाऱ्या उत्पन्नाची हेराफेरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
मौजे कोल्हेर व लुकामसला येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या नावे एकूण ११७एकर जमीन नोंद आहे. त्यापैकी मौजे कोल्हेर येथील गट क्रमांक ५१ मधील ६५ एकर जमीन राधेश्याम अट्टल यांनी महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतीने स्वतःच्या नावावर करून घेतली.