217 kg of sandalwood seized in Parli Vaijnath
परळी, पुढारी वृत्तसेवा: परळी वैजनाथ शहराच्या उपनगरात चंदन तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुप्त माहितीनंतर टाकलेल्या धाडीत सुमारे २१७किलो चंदन लाकूड जप्त केले असून त्याची अंदाजित किंमत ८ लाख ६८ हजार रुपये आहे. मात्र छाप्यावेळी संशयित चंदन तस्कर हे घटनास्थळावरून फरार झाले.
ही कारवाई २३ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली. परळी वैजनाथ रेल्वे पटरीच्या उत्तर बाजूस इराणी गल्लीच्या परिसरात काही तस्करांनी कापडी पालांमध्ये मोठ्या प्रमाणात चंदन साठवले असल्याची माहिती बीड एलसीबी पथकाला मिळाली होती. पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकली.
मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनेच्या काही क्षणांपूर्वीच फरार झाले. ही कारवाई बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात हवालदार रामचंद्र केकान, नाईक पोलिस कॉन्स्टेबल गोविंद भताने, पो. कॉ. सचिन आंधळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या वेळीच आणि योजनाबद्ध कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी रोखण्यात यश आले आहे. मात्र परळी व परिसरात मागील काही महिन्यांपासून चंदन लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत होते. ही कारवाई केवळ एका टोळीचा भाग असण्याची शक्यता असून मागील कारवाया,व साखळी तस्करीच्या दिशेने तपास सुरु आहे.
या घटनेप्रकरणी परळी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करून पाठविण्यात आले आहे.