अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर व हॉर्न दुचाकीला लावून 'आवाज' आमचाच असे म्हणणाऱ्यांना वाहतूक शाखेने तब्बल सव्वा लाख रुपयांचा दंड ठोठावत १८० गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले.
मागील कित्येक महिन्यांपासून अंबाजोगाई शहरात कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सर लावण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे वृद्ध, हृदयरुग्ण यांना त्रासही होत होता. सामान्य नागरिकांतून येत असलेल्या तक्रारीमुळे पोलिस अधीक्षक बारगळ यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेने २६ बुलेटचे सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट व कर्णकर्कश आवाज असणारे हॉर्न असे मिळून १८० वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख ३० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे.
बीड वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप वाहतूक पोलिस बजरंग ठोंबरे, दराडे, नितीन काकडे, आर.टी. पवार, आदिनाथ मुंडे, वसीम शेख, अरुण राऊत, त्रिंबक फड, गायकवाड, या वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली. अंबाजोगाई शहरात बीड वाहतूक पोलिस शाखेचे पथक आठ दिवसातून एकदा येऊन अशा कारवाया करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.
कारवाईची मोहीम संपली असे नागरिकांनी समजू नये असे देखील सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी म्हटले आहे.