Kaij Taluka Student Youth End Life
केज : तालुक्यातील बोबडेवाडी येथील १६ वर्षीय आकाश नितीन बोबडे या दहावीतील विद्यार्थ्याने २१ सप्टेंबर रोजी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. आकाश गोटेगाव येथील सम्राट अशोक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. घटनेनंतर त्याच्या मृत्यूमागील कारणाबाबत विविध चर्चा सुरू असून, कुटुंबीयांनी शिक्षणाचा आर्थिक भार आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
आकाशचे वडील रिक्षा चालवतात, तर कुटुंबाकडे अवघी एक एकर जमीन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आकाशची बहीण सृष्टी हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवले होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी नामांकित संस्थेत प्रवेश घेणे कुटुंबासाठी अडचणीचे ठरल्याचे सांगण्यात येते. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जमीन विकण्याची चर्चाही कुटुंबात सुरू होती, अशी माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बोबडे यांनी दिली.
आकाश हा मराठा आरक्षणाच्या मागणीशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट व रील्स शेअर करत असल्याचेही नातेवाईक व स्थानिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या मृत्यूचा संबंध मराठा आरक्षणाच्या प्रश्नाशी जोडला जात असून, ‘तो आरक्षणाच्या प्रश्नाचा बळी ठरला’, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे. युवा कार्यकर्ते निरंजन बोबडे यांनीही शिक्षण आणि आरक्षणाच्या प्रश्नामुळे तरुणांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाकडे लक्ष वेधले.
या प्रकरणी आकाशचे चुलते दौलत बोबडे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाशच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनानंतर २२ सप्टेंबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने बोबडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे