Beed News : वसतिगृहातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवले file photo
बीड

Beed News : वसतिगृहातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवले

त्रास दिल्याचा आरोप; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

13-year-old student at a hostel ends his life

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : वसतिगृहातील शिक्षकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे वडिलांना सांगितल्यानंतर अवघ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समर्थ आबासाहेब खरात (रा. कवडगाव, ता. गेवराई) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समर्थ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील प्रताप ढाकणे यांच्या हिंद वसतिगृहात राहून इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता. त्याचा भाऊ साई हा याच वसतिगृहात राहून पाचवीत शिकत होता. दरम्यान, वसतिगृहात कार्यरत असलेले शिक्षक सुभाष घुगे हे मागील काही दिवसांपासून विनाकारण वारंवार त्रास देत असल्याचे समर्थन आपल्या वडिलांना सांगितले होते, अशी माहिती फिर्यादीत नमूद असल्याचे समजते.

दरम्यान, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी समर्थने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुरक्षित वातावरण मिळणे ही वसतिगृह प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत ऐकून त्यांची दखल घेतली जाते का, त्यांच्याशी शिक्षकांचे वर्तन कसे असते आणि अशा घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाते, असे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT