मराठवाडा

बीड: नित्रुडमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट

अमृता चौगुले

माजलगाव(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : नित्रूड गावात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. नित्रुडसह परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली. गारपीट व अवकाळी पावसामूळे आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा ही पिकांना फटका बसला आहे. उभी पिके ही भिजल्याने ज्वारी व गहू पिकाचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

पावसासह गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पिकांसह आंबा आणि इतर फळबागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा ही पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. तर उभी पिके भिजल्याने ज्वारी व गहू पिकांचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. भिजलेल्या ज्वारी व गहू पिकाला भाव चांगला मिळणार नसल्याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. खरीप हंगामात सततच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीमध्ये तालुक्यातील नित्रूड महसूल मंडळ असून याचे अनुदान येणे अजून शासन स्तरावर प्रलंबित असून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.

या अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग असताना रब्बी पिकांवर अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट आल्याने शेतकरी वर्गाची घोर निराशा झाली आहे. तर खरीप हंगामाच्या नुकसानीचे अनुदान आणखी पदरात पडले नसल्याने रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी शासन मदत करणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी किसान सभेचे तालुकाध्यक्ष अशोक डाके यांनी केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT