मराठवाडा

बीड: माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडला

अविनाश सुतार

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील रहिवासी असलेले व तेलगाव अजिंक्य हॉस्पिटल येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. दत्ता फपाळ माजलगाव धरणात रविवारी पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना धाप लागल्याने ते पाण्यात बुडाले होते. मात्र, त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर आज (दि. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मच्छिमारांच्या गळाला डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह लागून सापडला. दरम्यान, फपाळ यांचा शोध घेताना कोल्हापुरच्या पथकातील जवान राजकिशोर मोरे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉ.दत्ता फपाळ माजलगाव धरणावर दररोज मित्रासोबत पोहण्यासाठी जात होते. रविवारी धरणावर ते पोहण्यासाठी गेले होते. धरणात लांबवर पोहत गेल्यावर तेथून परत येताना त्यांना दम लागला. त्यामुळे घाबरुन ते पाण्यात बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापनची पथके आली. मात्र, दिवसभर शोध लागला नसल्याने कोल्हापूर येथील केडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

त्या पथकातील दोन जवान पाण्यात आॕक्सिजनसह उतरले. मात्र, मासेमारीच्या जाळ्यात अडकून राजकिशोर मोरे या जवानाचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जवळपास ४ तासानंतर स्थानिक मच्छिमारांनी बाहेर काढला. त्यानंतर पुन्हा डॉ. दत्ता फपाळ यांचा शोध सुरुच केला असता स्थानिक मच्छिमारांच्या गळाला त्यांचा मृतदेह लागला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT