केज ; पुढारी वृत्तसेवा केजमध्ये चंदन चोरांचा धुडगूस सुरूच असून, मागच्या आठवड्यात महामार्गावर असलेल्या विश्रामगृह परिसरातील चंदन चोरीनंतर आता चक्क पोलीस ठाण्या समोरील रोडलगत असलेल्या न्यायाधीशांच्या निवासस्थाना जवळची चंदनाची झाडे मशिनने कापून चंदनचोरांनी पोलीस आणि प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील केज मांजरसुंबा रोडवर न्यायालय आणि पोलीस ठाणे समोरा-समोर आहे. तर न्यायालयाच्या पूर्वेला पंचायत समिती तर पश्चिमेला शासकीय विश्रामगृह आहे. या रोडवर चोवीस तास रहदारी सुरु असते. पोलीस ठाणे, न्यायालय, पंचायत समिती आणि शासकीय विश्रामगृह ही कार्यालये एकमेकांच्या शेजारी आणि हाकेच्या अंतरावर आहेत. असे असताना सोमवार दि. २८ मे ते २९ मे च्या मध्यरात्री चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे.
केज न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पावसकर मॅडम या राहात असलेल्या 'जुई' नावाच्या शासकीय निवासस्थानाच्या मागील बाजूला पूर्व दिशेला संरक्षक भिंतीलगत एक चंदनाचे झाड होते. हे चंदनाचे झाड चंदन तस्करांनी मशीनने कापून त्यातील मौल्यवान गाभा चोरून नेला आहे. तर उर्वरित झाड पंचायत समितीच्या आवारात टाकले आहे. यामुळे आता न्यायालयाच्या परिसराची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आलेली आहे.
या चंदन चोरी प्रकरणी कार्यालयीन अधीक्षक ज्योती पंडितराव वाघमारे यांनी दि. ३० मे रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या मागील एक महिन्यापासून केज न्यायालय येथे प्रतिनियुक्तीवर नेमणुकीस आहेत. दि २९ मे रोजी १०:३० वा. त्या ड्युटीसाठी केज येथील कार्यालयात हजर झाल्या आणि सायंकाळी ५:०० वा. पर्यंत कार्यालयात कामकाज केले. ५;०० वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यायालयात काम करणारे ॲड. एस. एल. गलांडे यांनी सांगीतले की, न्यायालयाच्या आवाराच्या पाठीमागे मा. न्यायाधिश यांचे निवासस्थान आणि पंचायत समिती कार्यालयाचे वॉल कंपाऊंडच्या मध्यभागी असलेले चंदनाच्या झाडाच्या फांद्या तुटलेल्या दिसत आहेत. यावरून त्यांनी आणि कार्यालयातील शिपाई नितीन जगताप यांनी मा. न्यायधिश यांच्या निवासस्थानाच्या पाठीमागील बाजुला जाऊन पाहिले असता, चंदनाचे झाड तोडलेले दिसले. त्या झाडाच्या फांद्या कोर्टाच्या व पंचायत समितीच्या वॉल कंपाऊडवर पडलेल्या दिसल्या. त्या नंतर पिठासीन अधिकारी न्यायाधीश पावसकर मॅडम यांना त्या बाबत माहिती दिली. मा. न्यायाधीश यांनी मा. जिल्हा न्यायाधीश बीड यांना त्या घटनेची माहिती दिली. त्या नुसार दि. ३० मे रोजी मला मा. न्यायाधीश पावसकर मॅडम यांनी त्यांना तक्रार देणे बाबत आदेश दिले.
त्या नुसार त्यांनी दि. ३० मे रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चंदनाचे झाड तोडून त्याची चोरी व तस्करी केली म्हणून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान चंदन तस्करांनी मागील आठवड्यात दि. २१ मे रोजी शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील तीन चंदनाच्या झाडांची तस्करी करून झाडे तोडुन नेली होती. त्या नंतर दि. २३ मे रोजी तीन दिवसा नंतर उपअभियंता मळेकर यांनी केज पोलीसांना पत्राद्वारे या चंदन चोरीच्या घटनेची लेखी पत्राद्वारे माहिती दिली होती.
अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा आणि मग्रुरी
प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी चंदन चोरी प्रकरणी उपअभियंता युवराज मळेकर यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी झाडाला पाणी आम्ही घातले आहे; तुम्ही नाही. म्हणून त्या चंदन चोरीची काळजी माध्यमांनी करू नये, असे चीड उत्पन्न करणारे आणि मग्रुरीचे उत्तर देत चंदन चोरांची पाठराखण केली असा गैरसमज निर्माण केला. त्या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.