मराठवाडा

बीड : वीज खंडित केली जाणार असल्याचा मॅसेज करून दीड लाख उकळले

अविनाश सुतार

बीड; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही मागच्या महिन्याचे वीज बील भरलेले नाही. आज रात्री तुमची वीज खंडित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधा, असा मेसेज पाठवून त्यावर संपर्क करण्यास वीज ग्राहकास सांगितले. त्यानंतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून वीज ग्राहकाच्या अकाऊंटमधून दीड लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार बीड शहरातील धोंडीपुरा भागात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील धोंडीपुरा भागात राहणार्‍या धनंजय भास्कर डोंगरे (वय ५१) यांना १८ जून रोजी दुपारी १२ वाजता एका मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. त्यामध्ये तुम्ही मागच्या महिन्याचे बील भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री ९.३० वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित  केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे लिहीले होते. त्यावर विश्‍वास ठेवून धनंजय डोंगरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता मी महावितरणचा अधिकारी बोलत असून तुम्ही टीम व्ह्युअर अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करा, असे सांगितले.

त्याचा पासवर्ड डोंगरे यांनी संबंधिताला सांगताच त्याच्याकडे मोबाईलचे अ‍ॅक्सेस गेले. त्यानंतर त्याने डोंगरे यांच्या बँक अकाऊंटमधून तीन वेळेस पन्नास हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंगरे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवि सानप करीत आहेत.

महावितरणच्या अधिकार्‍यांचे हात वर

याबाबत बीडच्या अधीक्षक अभियंत्यांचा पदभार असलेले निकम यांना याबाबत संपर्क साधला असता आम्ही असे मेसेज पाठवत नाही, तुम्ही अधिक माहितीसाठी पीआरओंशी संपर्क साधा, असे उत्तर दिले.

मेसेज पाठवणे बंदच करा

महावितरणकडून ग्राहकांना तुमच्या मीटरची आज रिडींग घेतली जाणार आहे, तुमच्या भागातील वीज आज अमुक वेळेत बंद राहणार आहे, तुमच्या मीटरची रिडींग अमुक एव्हढी झाली आहे, असे मेसेजेस पाठवण्यात येतात. त्याचाच गैरफायदा घेत ऑनलाईन भामट्यांनी सर्वसामान्यांची लूट सुरु केली आहे. महावितरणच्या नावाचा असा गैरवापर होत असताना त्यावर कारवाई केली जात नसेल. तर महावितरणनेही अशा सूचना देणारे एसएमएस काही कालावधीकरिता तरी बंद करावेत, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT