गंगाखेड: पुढारी वृत्तसेवा : बाभळीच्या झाडावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१७) दुपारी दोनच्या सुमारास उखळी (बुद्रुक) (ता. गंगाखेड) येथे घडली. महिलेला अंबेजोगाई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून अन्य दोघांवर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील उखळी (बुद्रुक) परिसरात विजेच्या कडकडटासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये बालासाहेब बाबुराव फड (वय ४८) जयवंत उर्फ परशुराम गंगाधर नागरगोजे (वय ३७) या दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर राहीबाई बाबुराव फड (वय ७०) ही महिला गंभीर जखमी झाली.
तर अन्य दोन जखमी राजेभाऊ किशनराव नरवाडे (वय ३५) व सतिश सखाराम नरवाडे (वय ३०) यांच्यावर गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त कळताच आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मृत व जखमी शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा