औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात आझादी का अमृत महोत्सवाचा अंतर्गत सलग १५ तास अभ्यास अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
अभियानाच्या सुरुवातीला या अभियाना मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. अरविंद धाबे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, अवांतर वाचन वाढवावे व अभ्यासाच्या बैठकांची सवय लावावी. समारोपप्रसंगी बोलताना विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची अभ्यासक करण्याची सवय कमी झाली होती. ही सवय पुन्हा लागावी व विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करुन स्पर्धापरीक्षेमध्ये यश संपादन करावी यासाठी या अभिनव उपक्रमांचे आयोजन विभागात करण्यात आले.
डॉ. अरविंद धाबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वनस्पतीशास्त्रातील दुर्मीळ ग्रंथासह संदर्भ ग्रथ, संशोधन पत्रिकासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते. यात एकूण ६५ विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. शहरात राहणारे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीदेखील सकाळी ४:४५ वाजता विभागात हजर राहिले.
मंगळवार दि. १० मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सेमिनार हॉलमध्ये हे अभियान राबवण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी जागेवरच चहा, नाष्टा, दुपारचे जीवन व अल्पोपहार देण्यात आला.
हा अभिनव उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सीमा डोंगरे, सुनील गवळी, इंद्रजिल जवीने, किशोर पाईकराव, पूजा सांवत, अजय झिंजाडे, वैभव मिसाळ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संशोधक विद्यार्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सृष्टी काळे हिने केले व आभारप्रदर्शन डॉ. श्रीकांत माने यांनी केले.