Manoj Jarange Patil Audio Clip Pudhari
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: ऑडिओ क्लिपची तारीख आधीच कशी कळली? जरांगे आक्रमक; रामदास कदमांना थेट सवाल करत म्हणाले, 'शिंदेंच्या मुलाचे...'

Manoj Jarange Audio Clip: ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा करत जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Rahul Shelke

Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिपच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप कोणत्या तारखेची आहे, हे आधीच कसे समजले, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

रामदास कदमांना क्लिपची तारीख आधीच कशी समजली?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांनी काल सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, त्याआधीच रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण दाखवलेल्या ऑडिओ क्लिपच्या तारखेबाबत माहिती दिली होती. त्यामुळे ही माहिती त्यांना आधीच कुठून मिळाली, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला.

“माझं एकनाथ शिंदे साहेबांना सांगणं आहे की, जवळचे लोक धोकादायक असतात. माझ्यासोबत असलेल्या अनेक लोकांना फोडण्यात आलं आहे. त्यावरून मी हे सांगत आहे,” असे जरांगे म्हणाले.

या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होत असून त्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा दावाही त्यांनी केला. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिपची तारीख कशी समजली, याची विचारणा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘ऑडिओ क्लिप खरी आहे, याची चौकशी करा’

आपण समोर आणलेली ऑडिओ क्लिप खरी असून ती बनावट नसल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. या क्लिपची सत्यता तपासून संपूर्ण प्रकरण जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. आपल्या पक्षातील नेत्यांची नावे आली आहेत म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये. असे झाले, तर जनतेचा विश्वास कमी होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

“हा गंभीर विषय आहे. माझ्याविरोधात मोठा कट रचण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्य शोधून काढले नाही, तर हे तुम्हीच केले, असा आमचा समज होईल,” असे ते म्हणाले. या प्रकरणात कोणाचाही बचाव करण्याऐवजी सत्य बाहेर आणण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव आल्याचा दावा

या ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव आल्याचा उल्लेखही मनोज जरांगे यांनी केला. या प्रकरणात नेमके काय घडले, याची माहिती शिंदे यांनी भाजपकडून घ्यावी, असे ते म्हणाले.

“भाजपने पैसे दिले असतील, तर एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, आम्ही तुम्हाला पैसे दिले आहेत,” असे विधान जरांगे यांनी केले. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे आणि फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. हे मोठे षड्यंत्र असून त्याचा धोका केवळ एका पक्षाला नाही, तर राज्यातील अनेक राजकीय पक्षांना होऊ शकतो, असा इशारा जरांगे यांनी दिला. शिंदे, फडणवीस यांच्यासह शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनाही अशा प्रकारचा धोका असल्याचे ते म्हणाले.

‘एआयने क्लिप तयार केली असती, तर इतक्या लोकांचे आवाज कसे?’

ऑडिओ क्लिप AI मदतीने तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात असताना जरांगे यांनी त्यावरही भाष्य केले. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचा आवाज तयार करण्यासाठी त्या व्यक्तीच्या आवाजाची माहिती असणे आवश्यक आहे. या क्लिपमध्ये अनेक लोकांचे आवाज असल्याने ती एआयच्या मदतीने तयार करण्यात आली, हा दावा खोटा आहे.

“एआयने ऑडिओ क्लिप बनवायची असती, तर एक-दोन जणांच्या आवाजाबाबत तसं करता आलं असतं. पण या क्लिपमध्ये इतके जण आहेत. इतक्या लोकांचे आवाज एआयच्या मदतीने कसे तयार करता येतील?” असा सवाल त्यांनी केला.

ही क्लिप खरी असल्याचा दावा करत, अशा प्रकारे लोकांना बदनाम करून त्यांचे नुकसान केले जात असेल, तर ती गंभीर बाब असल्याचे जरांगे म्हणाले.

ऑडिओ क्लिपचा स्रोत सांगण्यास नकार

ही ऑडिओ क्लिप आपल्याला कोणी दिली, याची माहिती आपण देणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने आपल्या पक्षातील नेत्यांना वाचवण्याऐवजी निष्पक्ष चौकशी करावी, असे ते म्हणाले. या प्रकरणात मराठा समाजातील तरुण आणि समन्वयकांना फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT