Maharashtra Weather Monsoon 2025 Mumbai Pune Rain Alert
मुंबई : सोमवारी पहाटेपासून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून नदीकिनारी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर मुंबईत सकाळ सात पासून पुढील तीन तासासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर अद्याप पावसाचा परिणाम झालेला नाही. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक वेळेवर सुरू असली तरी मध्य रेल्वेवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईत मध्यरात्री 2 ते पहाटे पाचपर्यंत मुसळधार पाऊस झाला. यात दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. फोर्ट येथे 74 mm, वांद्रे येथे 62 mm, मलबार हिल येथे 60 mm, लोअर परळ येथे 58 mm, हाजी अली येथे 57 mm, तर माटुंगा येथे 56 mm पाऊस पडला.
हवामानशास्त्र विभागातील निवृत्त अधिकारी आणि हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मुंबईत आणि लगतच्या भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑफिस आणि शाळेत जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट दिला असून सोमवारी सकाळी आठ वाजून मिनिटानी १.०६ मीटर उंचीची कमी भरी येण्याचा अंदाज आहे.
पुण्यातही सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे शहरात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
कोकणात सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकिनारच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला असून समुद्रालाही उधाण आल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा इशारा देणाऱ्या सतर्क या संस्थेनेही सोमवारी सकाळी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यात म्हटले आहे की, पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा तीव्र प्रभाव असेल. तसेच डोंगर उतारावर, कच्ची धरे आणि जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. कोकणातील घाट परिसरात पर्यटन टाळावे आणि प्रवासादरम्यान काळजी घ्यावी, असं आवाहन 'सतर्क' ने केले आहे.
गारगोटी- कोल्हापूर मार्गावर झाड पडले
गारगोटी- कोल्हापूर मुख्य मार्गावर निगवे खालसा जवळ सोमवारी सकाळी रस्त्यात झाड पडले. यामुळे या मार्गावरुन ST बस वाहतूक तब्बल अडीच तास बंद राहिली. गारगोटीवरून कोहापूरला येणाऱ्या प्रवाशांना निगवे येथून कावणे गावातून पर्यायी मार्गे यावे लागले. पण कावणे गावातून येणारा रस्ता अरुंद आहे. यामुळे वाहतूक धिम्या गतीने सूरू राहिली. तसेच शेळेवाडीतून ठिकपूर्ली मार्गे परिते, हळदी मार्गे कोल्हापूरला येता येते.
दरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास रस्त्यात पडलेले झाड काढून रस्ता मोकळा करण्यात आला. यामुळे वाहतूक पूर्ववत सुरु झाली. या मार्गावर सकाळी सात वाजता एक झाड पडले. ते काढल्यानंतर पुन्हा एक मोठे झाड रस्त्यावर पडले. यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरुन प्रवास करताना काळजी घ्यावी.