Maharashtra Government GR Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Govt GR: आचारसंहिता लागण्याआधीच राज्य सरकारने घेतले 220 निर्णय; बदल्या आणि नियुक्त्यांचा धडाका

Maharashtra Government GR Before Election: राज्यात नगरपालिका व नगरपंचायती निवडणुका जाहीर होण्याच्या काही तास आधीच सरकारकडून 220 हून अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले.

Rahul Shelke

Maharashtra Government GR Before Election Code: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारकडून अक्षरशः निर्णयांचा पाऊस पडला. केवळ काही तासांत 220 हून अधिक शासन निर्णय (GRs) जारी करण्यात आले, ज्यामध्ये निधी वाटप, नियुक्त्या, आणि बदल्यांना मान्यता देण्यात आली.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने विविध योजना आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यात मुख्यत: —

  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी ₹100 कोटींचा निधी

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ₹187 कोटी 98 लाख रुपयांची मंजुरी

  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी रब्बी पेरणीसाठी ₹3,499 कोटी 84 लाखांचा निधी

तसेच, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिका यांना ₹5 कोटींपासून ₹10 कोटींपर्यंतचा निधी देण्यात आला. हा निधी नागरी भागातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे.

महामंडळांच्या योजनांनाही ग्रीन सिग्नल

सरकारने सामाजिक गटांसाठी स्थापन केलेल्या विविध आर्थिक महामंडळांच्या नव्या योजनांनाही तातडीने मंजुरी दिली.

  • परशुराम आर्थिक विकास महामंडळ (ब्राह्मण समाज)

  • वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ (राजपूत समाज)

  • श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ (आर्य वैश्य समाज)

या संस्थांच्या माध्यमातून नव्या योजना राबवण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.

बदल्या, नियुक्त्या आणि प्रतिनियुक्त्या

आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या आणि प्रतिनियुक्त्या यांना मान्यता देण्यात आली. तसेच काही शासकीय तंत्रनिकेतन संस्थांना मान्यता देणारे निर्णयही या काळात जाहीर करण्यात आले. या घडामोडींमुळे राज्य प्रशासनातील हालचालींना अक्षरशः वेग आला.

नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार,

  • 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.

  • 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी पार पडेल.
    या निवडणुकांमध्ये एकूण 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती, म्हणजेच 288 ठिकाणांवर मतदान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT