कोल्हापूर

कोल्हापूर : खिद्रापूर मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

सोनाली जाधव

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा
शिलाहार काळात 12 व्या शतकात उभारलेल्या, शिल्पवैभव म्हणून लाभलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तसेच मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिवाय मंदिर दुरुस्तीसाठी 107 कोटींच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
दैनिक 'पुढारी'ने मंदिराच्या दुरवस्थेकडे विशेष वृत्त देऊन लक्ष वेधले होते. यानंतर सरकारी पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या. राज्यमंत्री यड्रावकर यांनी खिद्रापूरला भेट देत पाहणी करून निधीची घोषणा केली होती.

ना. यड्रावकर म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराविषयी सविस्तर माहिती दिली होती. या मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी निधीची तरतूद करावी असा आग्रह केला होता. याचाच भाग म्हणून सन 2021-22 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात खिद्रापूरसह राज्यातील आठ पुरातन व प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभाग तसेच राज्याचा रस्ते विकास महामंडळाला या सर्व मंदिरांच्या संदर्भाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासंदर्भातचे आदेश दिले होते.

किमया कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट कंपनीने कोपेश्‍वर मंदिराच्या परिसरात मूर्ती व खांब यांना गेलेले तडे, मंदिरासाठीचे शिखर, संरक्षक भिंत, आणि दुरुस्तीच्या अनुषंगाने येणार्‍या मंदिराच्या सर्व प्रकारच्या कामासाठी 37 कोटी तर मंदिर परिसरामध्ये घाट बांधणे, भक्‍त निवास, बोटिंग आणि पर्यटनाच्या द‍ृष्टिकोनातून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास 60 कोटी असे एकूण 107 कोटी रुपये अपेक्षित खर्चाचा अहवाल केंद्र व राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT